Monday, August 24, 2026

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा कपाशीवरील रसशोषक किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सल्ला


कपाशी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व मावा यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे १६ ते २७ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच योग्य उपाययोजना कराव्यात. अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून जैविक, यांत्रिक व रासायनिक उपायांचा योग्य समन्वय साधत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विभागात कार्यरत असलेल्या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक तथा कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांनी दिला आहे.

कपाशीवरील रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाचे निरीक्षण करावे. अंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावे तसेच नत्र खताचा संतुलित वापर करावा. रसशोषक किडींना भक्ष्य करणारे ढालकीडे व क्रायसोपा या मित्रकीटकांचे प्रौढ व अळ्या शेतात आढळल्यास त्यांचे संवर्धन करावे आणि शक्यतो कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे, तर फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे हेक्टरी १० ते १२ या प्रमाणात लावावेत. पिठ्या ढेकणाच्या व्यवस्थापनासाठी व्हर्टीसीलीयम लेकॅनी १.१५ टक्के डब्ल्यूपी या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

किडींची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी प्रति लिटर पाण्यात फ्लोनीकॅमीड ५० टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन ५० टक्के डब्ल्यूपी १.२ ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के एससी २ मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एससी ३ मिली किंवा टोल्फेनपायराड १५ टक्के ईसी २ मिली किंवा ॲसीफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एसपी २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के + बुप्रोफेझीन २० टक्के एससी २ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या/नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. तसेच पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबर महिन्यापूर्वी सुरू करू नये. अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार आणि शिफारशीनुसारच कीटकनाशकांचा वापर करून कपाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.