Sunday, August 16, 2026

माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांची ‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ परिसंवादानिमित्त आयोजित कृषि प्रदर्शनास भेट

 



महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा.  ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या विषयावरील परिसंवादानिमित्त आयोजित कृषि प्रदर्शनास भेट देऊन विविध दालनांची पाहणी केली.

या प्रदर्शनात देशी गोवंश, नैसर्गिक शेती तसेच मसाला पिकांच्या विकासासाठी उपयुक्त विविध तंत्रज्ञान, कृषि निविष्ठा, पीकविषयक माहिती आणि जिवंत नमुने प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली विविध कृषि उत्पादनेही प्रदर्शनात मांडण्यात आली होती. माननीय कृषि मंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी या उत्पादनांची व तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करून उत्साह वाढविला.

प्रदर्शनादरम्यान देशी गोवंशाचे संगोपन, नैसर्गिक शेती पद्धतींचा विस्तार, रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर कमी करून पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन तसेच मसाला पिकांमधील उत्पादनवाढ आणि मूल्यवर्धनासाठी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती मान्यवरांनी घेतली.

यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) उपस्थित होते.

तसेच संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर, परभणी आत्माचे संचालक श्री. दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर (परभणी), श्री. प्रदीप कच्छवे (हिंगोली) यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.