Monday, August 17, 2026

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती सादर करण्याची तसेच विविध कलामाध्यमांतून आपल्या कल्पना व भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.

या विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील सिद्धी संतोष रासवे, रिद्धी माणिक रासवे आणि श्रद्धा प्रभाकर अंबोरे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि कलात्मक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व कलाविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक कौशल्यांना चालना मिळते.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी अभिनंदन करून कौतुक केले. विद्यार्थिनींनी भविष्यातही विविध विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्यांच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहेत.