Monday, August 10, 2026

सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी आणि मराठवाडा शेती विकास प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन’ या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १० ऑगस्ट रोजी अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी येथे उत्साहात संपन्न झाले. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १० ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्षस्थानावरून बोलताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे पुरेसे नाही, तर उत्पादित कृषिमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे तसेच काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि शासन यांनी परस्पर समन्वयाने एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांनी शेती क्षेत्रात केवळ उत्पादन वाढविणे महत्त्वाचे नसून उत्पादित कृषिमालाचे योग्य विपणन व प्रभावी वितरण व्यवस्था याकडेही विशेष लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद करून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मराठवाडा शेती विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अन्नतंत्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. मनोज लोहिया यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने आणि शेतकरी कुटुंबातील युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगारनिर्माते बनले पाहिजे. यामुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल.

या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन मूल्यवर्धनाचे महत्त्व तसेच या क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षणादरम्यान सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची विविध तांत्रिक तसेच प्रात्यक्षिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

कार्यक्रमास सेवानिवृत्त न्यायाधीश श्री. शंकर ढवळे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, अन्नतंत्र महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता, महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, शेतकरी प्रशिक्षणार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वतीने अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विजया पवार यांनी कार्यक्रम समन्वयिका म्हणून कार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले, तर डॉ. अनुप्रिता जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रशिक्षणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन प्रक्रिया, मूल्यवर्धन, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाच्या विविध संधींबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे.