महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्रास १५ ऑगस्ट रोजी
भेट देऊन केंद्रातील संशोधन व विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
यावेळी माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केंद्रातील
संशोधन कार्याची पाहणी करून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि शाश्वत शेतीच्या
विकासासाठी संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे प्रसार
करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ.
श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे,
कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम व डॉ. हरिहर कौसडीकर तसेच बायोमिक्स संशोधन
केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.
भेटीदरम्यान माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला पिकांमध्ये विक्रमी उत्पादन मिळाले असून, शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे
ठरत आहे. बायोमिक्सच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त बुरशी व जिवाणूंची संख्या
वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती आणि
उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे विविध प्रयोगांतून निष्पन्न झाले आहे. सध्या
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये बायोमिक्सची लोकप्रियता झपाट्याने
वाढत असून, त्याच्या वापराकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर
कल वाढला आहे. या तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसंती व मान्यता मिळत
असून, हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय
पीक संशोधन संस्था (ICRISAT – International Crops Research Institute for
the Semi-Arid Tropics) यांनी बायोमिक्सच्या ४ टन पुरवठ्याची मागणी
केली होती. त्यानुसार नुकताच ४ टन बायोमिक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. भविष्यात
शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि क्षेत्रीय चाचण्यांची
व्याप्ती वाढवून या तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा
मानस यावेळी माननीय कुलगुरूंनी व्यक्त केला.
बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी
केंद्रामध्ये सुरू असलेले विविध संशोधन कार्य, विकसित
तंत्रज्ञानाचे हस्तांतरण तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर बायोमिक्सच्या वापरामुळे
झालेली उत्पादनवाढ याबाबत मान्यवरांना सविस्तर माहिती दिली. या भेटीप्रसंगी
बायोमिक्स विभागातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
.jpeg)
.jpeg)
