Wednesday, August 12, 2026

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातर्फे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे दिनांक १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक १२ ऑगस्ट रोजी कृषि महाविद्यालय परिसरात परिसर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हरियाली अमावस्येनिमित्त दिनांक १२ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन आणि हरित व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी  यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते तसेच संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या उपस्थितीत आणि कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कृषि महाविद्यालय परिसरात १० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी एक झाड मा के नाम’ हा पर्यावरणपूरक संदेश दिला. कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, त्यापैकी आतापर्यंत ३५० वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती दिली. लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. सचिन मोरे, डॉ. हरिहर कौसडीकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. सुरेश वाईकर, श्री. विजय गारकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. संतोष ठोंबरे, श्री. श्रीनिवास भारती आणि डॉ. सुवर्णा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.