Friday, August 7, 2026

कृषि हवामानशास्त्र : कृषि क्षेत्रातील नवीन क्षितिजांचा वेध घेणारे शास्त्र

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान आधारित कृषि संशोधनाला प्राधान्य देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन


 कोयमतूर येथे आयोजित परिसंवादात मौखिक सादरीकरणामध्ये कु. स्वप्नाली हिने द्वितीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल माननीय कुलगुरू यांच्या हस्ते  सत्कार 

बदलत्या हवामान परिस्थितीचा कृषि उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता, कृषि हवामानशास्त्रातील संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या विषयातील संशोधनाची दिशा आधुनिक तंत्रज्ञान, अचूक हवामान अंदाज आणि हवामान आधारित पीक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

कृषि हवामानशास्त्र विभागास माननीय कुलगुरूंनी दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन विभागातील विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कृषि हवामानशास्त्र विषयातील पीएच.डी. व पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या संशोधन विषयांची माहिती घेतली तसेच संशोधनाच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.

कृषि हवामानशास्त्र विभागाकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक उपकरणांचा विद्यार्थी व प्राध्यापकांनी संशोधनासाठी अधिकाधिक प्रभावीपणे उपयोग करावा. हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती तसेच विविध हवामानविषयक जोखमींचा कृषि उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संशोधन करण्यात यावे, अशी सूचना माननीय कुलगुरूंनी केली.

हवामान बदलाच्या अनुषंगाने योग्य पीक पद्धतींची शिफारस, हवामान आधारित पीक सल्ला, अचूक पीक उत्पादन अंदाज, हवामान जोखीम व्यवस्थापन, हवामान-स्मार्ट कृषि तंत्रज्ञान तसेच शेतकऱ्यांना वेळेवर हवामानविषयक माहिती उपलब्ध करून देणाऱ्या प्रणाली या क्षेत्रात नाविन्यपूर्ण व शेतकरी-केंद्रित संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता आधुनिक उपकरणे, संगणकीय तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, रिमोट सेन्सिंग, उपग्रहाधारित माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक साधनांचा संशोधनामध्ये वापर करून कृषि हवामानशास्त्राला नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कृषि हवामानशास्त्र विषयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. स्वप्नाली हिने कोयमतूर येथे आयोजित परिसंवादात मौखिक सादरीकरणामध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल माननीय कुलगुरू यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि संशोधन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व संशोधन कौशल्याचा विकास करावा, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक, प्रयोगशाळा व संशोधन सुविधांचा आढावा घेतला. विभागाच्या अधिक आधुनिकीकरणासाठी तसेच उपलब्ध पायाभूत सुविधा आणि संशोधन क्षमता बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

यावेळी , कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य; कृषि हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किरण जाधव,  कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे तसेच कृषि हवामानशास्त्र विभागातील प्राध्यापकवृंद व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

कृषि हवामानशास्त्र हे बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत, उत्पादनक्षम आणि जोखीममुक्त कृषि व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे शास्त्र असून, विद्यापीठाच्या माध्यमातून या क्षेत्रातील संशोधन अधिक व्यापक करून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.