वनामकृविच्या लिहाखेडी-पालोद कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दक्षिण भारतातील शैक्षणिक सहल यशस्वी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी-पालोद (जिल्हा छत्रपती
संभाजीनगर) येथील शासकीय
कृषि महाविद्यालयाच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांची दिनांक ९ ते १७ ऑगस्ट
२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. या
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऊटी, म्हैसूर, बेंगळुरू तसेच तामिळनाडूतील विविध शैक्षणिक, प्रशिक्षण
व संशोधन संस्थांना भेटी देऊन कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची
प्रत्यक्ष माहिती घेतली.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च (IIHR), सेंट्रल फूड
टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI), तामिळनाडू
अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी (TNAU), म्हैसूर येथील सेरिकल्चर
संस्था तसेच इतर संबंधित संस्थांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये विद्यार्थ्यांना
फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, रेशीम
उद्योग, कृषि संशोधन, आधुनिक कृषि
तंत्रज्ञान, प्रशिक्षण सुविधा आणि विविध संशोधन प्रकल्पांची
प्रत्यक्ष माहिती मिळाली.
या शैक्षणिक सहलीत महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये ९ विद्यार्थिनी आणि ४१ विद्यार्थी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांसोबत
महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे
आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या
शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, विविध संस्थांशी समन्वय, प्रवासाचे नियोजन तसेच
विद्यार्थ्यांची सुरक्षितता यांचा विचार करून सहलीचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, विद्यार्थ्यांना
आधुनिक कृषि संशोधन व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच कृषि क्षेत्रातील भविष्यातील
संधींची माहिती मिळावी, हा या शैक्षणिक सहलीचा प्रमुख उद्देश
होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध संस्थांमधील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची
तसेच संशोधन व तंत्रज्ञानातील नवीन बाबी समजून घेण्याची संधी मिळाली.
ऊटी, म्हैसूर व बेंगळुरू येथील विविध शैक्षणिक व कृषिविषयक स्थळांना भेटी
देतानाच विद्यार्थ्यांनी स्थानिक कृषि पद्धती, फलोत्पादन,
रेशीम उद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राचाही अभ्यास केला. त्यामुळे
ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध आणि
संस्मरणीय ठरली.
या यशस्वी शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. आशिष
बागडे, डॉ. संतोष ढगे, डॉ. सुरेखा कदम आणि श्री. संदीप
इंगळे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील सर्व अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सहभागी विद्यार्थ्यांनी
या सहलीमुळे मिळालेला प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या शैक्षणिक तसेच भविष्यातील
व्यावसायिक वाटचालीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
.jpeg)


.jpeg)


.jpeg)
.jpeg)