Thursday, August 20, 2026

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वनामकृवित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सद्भावना संकल्प

 

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सद्भावना दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सद्भावना शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले. उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, शांतता, सद्भावना आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याची शपथ घेतली. विविधतेने नटलेल्या भारताच्या एकात्मतेसाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये परस्पर स्नेह, बंधुभाव व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प करण्यात आला.

विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून राष्ट्रीय सद्भावना दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.