Thursday, August 13, 2026

“माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” उपक्रमांतर्गत सनपुरी येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ आणि रावे विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांशी संवाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम मौजे सनपुरी, ता. जि. परभणी येथे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी राबविण्यात आला.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत २३ विद्यार्थी दोन महिन्यांसाठी मौजे सनपुरी येथे दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष कार्यानुभवातून शिक्षण घेण्याबरोबरच विद्यापीठाने विकसित केलेले कृषी व सामुदायिक विज्ञानविषयक तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरणाच्या संकल्पना तसेच विविध विस्तार उपक्रम ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे विद्यार्थी करणार आहेत. या विद्यार्थ्यांची ग्रामकन्या’ आणि ‘ग्रामदूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रावे कार्यक्रम समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांच्या समन्वयाने करण्यात येत आहे. गावात दाखल झाल्यानंतर ग्रामकन्या व ग्रामदूतांनी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि डॉ. शंकर पुरी यांच्या समवेत उपसरपंच श्रीमती गोदावरी सुगंधे तसेच ग्रामस्थांची बौद्ध विहार येथे भेट घेऊन संवाद साधला. यावेळी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व कृषीविषयक गरजांची माहिती घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आलेल्या संपर्क कुटुंबांच्या भेटी घेऊन कुटुंबांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, दैनंदिन कामकाज, शेतीतील सहभाग आणि महिलांच्या कामाचे स्वरूप याबाबत प्राथमिक माहिती जाणून घेण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या श्रमबचतीच्या साधनांचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामीण महिलांचा श्रम, वेळ व ऊर्जा वाचविण्यासाठी तसेच त्यांच्या कामाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशा साधनांचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. रावे उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठातील ज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाचे फायदे प्रत्यक्ष ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबांच्या समस्या आणि स्थानिक गरजा समजून घेण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

रावे कार्यक्रम समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी संपर्क कुटुंबांना या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले. रावे कार्यक्रमांतर्गत कृषी व गृहविज्ञान तंत्रज्ञान प्रसार, महिला व युवक जागृती, पोषण, आरोग्य, स्वच्छता, कौशल्यविकास, उद्योजकता, मूल्यवर्धन, बचत व आर्थिक साक्षरता तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील ज्ञान ग्रामीण भागापर्यंत आणि ग्रामीण भागातील अनुभव विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत” हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि विद्यापीठ यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रामकन्या व ग्रामदूतांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.