Saturday, August 15, 2026

वनामकृवित देशभक्तीच्या वातावरणात भव्य तिरंगा रॅली व ‘एक शाम देश के नाम’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ

भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘स्वातंत्र्यदिन–२०२६’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय कला मंच, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅली तसेच ‘एक शाम देश के नाम’ या देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

तिरंगा रॅलीचा शुभारंभ विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहापासून करण्यात आला. रॅलीला सुरवात होताच जोरदार पावसास सुरवात झाली, या बरसत्या पावसातही सुमारे ४७५ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी १२ × १५० फूट आकाराचा विशाल तिरंगा हातात धरून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दुमदुमून टाकला.

पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व आरोग्याची काळजी घेत माननीय कुलगुरूंच्या सूचनेनुसार उद्यानविद्या महाविद्यालयाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सायंकाळी ‘एक शाम देश के नाम’ या देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर गीत, संगीत व कला कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, राष्ट्रीय कला मंचचे डॉ. प्रवीण राठोड, श्री. गिरीश कौसडीकर आणि श्रीमती गायत्री लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये तिरंगा रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिज्ञा समारंभ, तिरंग्यासोबत सेल्फी, स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यावर भर देण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. बसलिंगाप्पा कलालबंडी, डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. शंकर पुरी, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. संतोष ठोंबरे, श्री. श्रीनिवास भारती, डॉ. स्वर्णा चौधरी तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.