एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या विभागातर्फे एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ‘आद्यरेखा (फ्रंटलाईन)
प्रात्यक्षिक – हळद रोप वाटप’ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात
आले. सुधारित हळद लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करणे, दर्जेदार लागवड साहित्याचा वापर वाढविणे तसेच हळदीचे उत्पादन, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश
अहिरे तसेच प्रमुख अन्वेषक तथा उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते शेतकऱ्यांना हळद
रोपांचे वाटप करण्यात आले. आद्यरेखा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित
हळद लागवड पद्धती, योग्य लागवड अंतर, दर्जेदार व निरोगी लागवड
साहित्याचा वापर, पीक व्यवस्थापन, रोग
व कीड व्यवस्थापन तसेच आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञान याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे
मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत २८ हून अधिक शेतकऱ्यांना एकूण ६० हजार हळद रोपांचे वाटप करण्यात
आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, स्थानिक पातळीवर आधुनिक
हळद उत्पादन पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होणार आहे. विशेषतः दर्जेदार लागवड साहित्याचा
वापर, शास्त्रीय पीक व्यवस्थापन आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याच्या
दृष्टीने हे प्रात्यक्षिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हळद हे मराठवाड्यातील महत्त्वाचे मसाला व नगदी पीक असून, बदलत्या हवामान परिस्थितीत
उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रीय व तंत्रज्ञानाधारित पीक व्यवस्थापन आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विद्यापीठातील संशोधनातून विकसित व शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाची
माहिती प्रत्यक्ष शेतपातळीवर उपलब्ध करून देणे हा या आद्यरेखा प्रात्यक्षिकाचा महत्त्वाचा
भाग आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की, शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य, सुधारित
उत्पादन तंत्रज्ञान आणि शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास हळद उत्पादनाची
उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यास निश्चितच मदत होईल. विद्यापीठाच्या संशोधनाचा थेट
लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांचा प्रभावीपणे उपयोग
व्हावा. हळद उत्पादन अधिक शाश्वत, गुणवत्तापूर्ण आणि
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना सातत्याने तांत्रिक
मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
उद्यानविद्या विभागाचे प्रमुख अन्वेषक डॉ. विश्वनाथ खंदारे, सहायक अन्वेषक डॉ.
अंशुल लोहकरे आणि सहायक अन्वेषक डॉ. शबनम सय्यद यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार
घेतला. यावेळी डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये
प्रात्यक्षिकाधारित प्रशिक्षण, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा
प्रसार आणि शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष पोहोचविण्यास विशेष महत्त्व दिले जाते.
या उपक्रमामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ मिळून
उत्पादनक्षमता, गुणवत्तावाढ आणि आर्थिक शाश्वततेस चालना मिळेल,
असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
.jpeg)


.jpeg)
