Wednesday, August 19, 2026

वनामकृविच्या कृषी महाविद्यालयात ‘सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ विषयावर कार्यशाळा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विविध वसतिगृहांतील विद्यार्थिनींसाठी सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन दि. १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहांमध्ये करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी, जि. अहिल्यानगर येथील वेलनेस इन्स्ट्रक्टर श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सशक्त युवती घडविण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मनिर्भरता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आहार, विहार, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, योग, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व विशद केले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगाभ्यास यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते, असे त्यांनी सांगितले. युवतींनी शिक्षणासोबतच स्वावलंबन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करून राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध योग, प्राणायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यविषयक प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांसाठी डॉ. सचिन पाठक व श्रीमती सोनी पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योग व आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घेतला.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, वसतिगृह अधीक्षक डॉ. गोदावरी पवार तसेच सहाय्यक वसतिगृह अधीक्षक श्रीमती सुनीता भुरके व श्रीमती अंजली इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यशाळेस कृषि महाविद्यालयातील विविध मुलींच्या वसतिगृहांतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्यदायी जीवनशैली, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांच्या माध्यमातून सक्षम युवती घडविणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सशक्त युवती हीच सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्राची आधारशिला आहे’ या संदेशाने कार्यशाळेची सांगता झाली.