गाजरगवताच्या समूळ निर्मूलनासाठी जैविक नियंत्रणाला चालना देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या
परोपजीवी कीटक संशोधन योजना व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘गाजरगवत
निर्मूलन सप्ताहा’निमित्त अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन
प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन
भुंग्यांच्या माध्यमातून दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि होते.
यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे व अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती
होती. मान्यवरांच्या हस्ते परोपजीवी कीटक संशोधन योजना कार्यालयामार्फत निर्मित व
संवर्धित करण्यात आलेले मेक्सिकन भुंगे अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी
व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी सोडण्यात
आले.
मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ तसेच त्यांच्या अळ्या गाजरगवताची पाने खात
असल्याने पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी गाजरगवताची वाढ व
पुनरुत्पादन क्षमता कमी होण्यास मदत होते. विद्यापीठ परिसरात या जैविक नियंत्रण
घटकांची संख्या वाढवून गाजरगवताचे पर्यावरणपूरक व शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या
उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
गाजरगवताचे केवळ नियंत्रण न करता त्याचे समूळ निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना
करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाजरगवत उपटून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट
लावणे तसेच त्यापासून नैसर्गिक खत तयार करून त्याचा उपयोग करणे शक्य असल्याचे
त्यांनी नमूद केले.
गाजरगवताच्या जैविक नियंत्रणामध्ये मेक्सिकन भुंग्याचे महत्त्वपूर्ण योगदान
असल्याचे स्पष्ट करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ व अळ्या दोन्ही गाजरगवताची पाने
खात असल्याने त्याच्या वाढीस मोठ्या प्रमाणात आळा बसतो. अनेक भागांमध्ये मेक्सिकन
भुंग्याच्या प्रभावामुळे गाजरगवताचे प्रमाण कमी झाले असून, त्याच्या
जैविक नियंत्रणात या भुंग्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
कीड, रोग किंवा तणांचा प्रादुर्भाव
झाल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतींचा प्रभावी वापर केल्यास
पर्यावरणपूरक व शाश्वत नियंत्रण साध्य करता येते. त्याचप्रमाणे गाजरगवताच्या व्यवस्थापनासाठी
गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व त्यांच्या अळ्या तसेच तरोट्यासारख्या
स्पर्धात्मक वनस्पतींचा वापर करून प्रभावी नियंत्रण साध्य करता येते. भविष्यात
गाजरगवताचे समूळ निर्मूलन करण्यासाठी अशा जैविक उपाययोजनांना अधिक चालना देण्याची
गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्त्व विशद करताना माननीय कुलगुरूंनी
सापळा पिके आणि जैविक नियंत्रण घटकांच्या प्रभावी वापराबाबत अधिक संशोधन करण्याची
गरज व्यक्त केली. विविध पिकांमध्ये सापळा पिकांचा वापर करून कीड व्यवस्थापन अधिक
प्रभावी करता येते. त्यामुळे मेक्सिकन भुंगा, त्याच्या
अळ्या तसेच सापळा पिकांच्या प्रभावी वापराबाबत संशोधनाला चालना देण्याचे आवाहन
त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन
प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील ड्रोन प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या वेळी कृषी
क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ड्रोनच्या वापराबाबत माहिती देण्यात आली तसेच
ड्रोनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कीड व रोग व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठी ड्रोन
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या प्रात्यक्षिकाचे महत्त्व
अधोरेखित करण्यात आले.
कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी विद्यापीठ
परिसरात गाजरगवत निर्मूलनासाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या
माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेदरम्यान
विद्यापीठ परिसरातील गाजरगवत उपटून त्याचे निर्मूलन, योग्य पद्धतीने विल्हेवाट तसेच गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व
त्यांच्या अळ्यांच्या माध्यमातून जैविक नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यात येणार
असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी
अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी गाजरगवत निर्मूलन सप्ताहाची उद्दिष्टे, गाजरगवतामुळे होणारे दुष्परिणाम तसेच मेक्सिकन भुंग्याचे
प्रौढ व अळ्या गाजरगवताची पाने खाऊन त्याचे जैविक नियंत्रण कशा प्रकारे करतात,
याबाबत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.
या उपक्रमात उपसंचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, एकात्मिक शेती पद्धतीचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, डॉ. धनंजय मोहड, कृषी अभियंता डॉ. विशाल इंगळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. ऋषिकेश औंढेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरत्न खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांच्यासह कीटकशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी तसेच कृषी महाविद्यालय, गोळेगाव येथील रावेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.




.jpeg)

