वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘स्वच्छता पखवाडा २०२६’ हा उपक्रम दिनांक १ ते १५
ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात आला.
भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार हा
उपक्रम आयोजित करण्यात आला. स्वच्छता पखवाड्याच्या कालावधीत तयार करण्यात आलेल्या स्वच्छता
कृती आराखड्यानुसार महाविद्यालय परिसरात विविध स्वच्छता, जनजागृती
व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत
जनजागृती, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांमध्ये
स्वच्छतेच्या सवयी विकसित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये
स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी
आणि शाश्वत व निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश
होता.
यानिमित्त बोलताना सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा अखिल
भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या केंद्र समन्वयिका डॉ. नीता
गायकवाड यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय कृती न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा
अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले. स्वच्छ परिसर,
निरोगी जीवन आणि पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार
घेऊन समाजामध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी
केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी स्वच्छता पखवाड्याच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक
उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाची भावना विकसित होत असल्याचे सांगितले. स्वच्छता
उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून
आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘स्वच्छ परिसर – निरोगी जीवन’
आणि ‘वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना
आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
‘स्वच्छता पखवाडा २०२६’च्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नीता
गायकवाड, डॉ. शंकर पुरी, महाविद्यालयातील
तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि
विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.



.jpeg)



.jpeg)
