Monday, August 17, 2026

इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेत शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

 


भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्था (NSRI) येथे आज दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सोयाबीन शेती दिन (फिल्ड डे)’ आणि शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कृषि महाविद्यालय, इंदूरचे अधिष्ठाता डॉ. भरत सिंह तसेच इंदूर जिल्ह्याचे उपसंचालक कृषि श्री. सी. एल. केवडा उपस्थित होते. राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्मृतिचिन्ह प्रदान करीत सत्कार केला.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी अवलंबिलेल्या पद्धती तसेच विविध कृषि तंत्रज्ञानांच्या वापराबाबत शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील थेट संवादातून क्षेत्रीय समस्या, अनुभव आणि संशोधनाधारित उपाययोजनांवर चर्चा झाली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शेतकरी व मान्यवरांनी संस्थेच्या संशोधन प्रक्षेत्राला तसेच

कृषि - व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्राला (अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन सेंटर) भेट दिली. यावेळी संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेली विविध कृषि उत्पादने, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित उपक्रमांची पाहणी करून त्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भा.कृ.अ.प. सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. सुरनर तसेच ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सोयाबीन पिकाचे अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी मराठवाड्यातील प्रातिनिधिक प्रगतिशील शेतकऱ्यांची भेट घडवून आणण्याच्या उद्देशाने शेतकरी प्रतिनिधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी श्री. मंगेश देशमुख आणि उद्यान पंडित श्री. प्रताप काळे यांच्यासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी, कृषि क्षेत्रातील अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषि विद्यापीठे यांच्यातील संवाद अधिक बळकट करून संशोधनातील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा ‘फिल्ड डे’ कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.