Thursday, August 13, 2026

वनामकृविच्या क्रीडा मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव

 राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा यश हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या क्रीडा मंडळाची (Board of Sports) महत्त्वपूर्ण बैठक विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणे, विविध क्रीडा उपक्रमांचे नियोजन करणे तसेच आगामी काळातील क्रीडा धोरणांबाबत चर्चा करणे हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

बैठकीस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश हे संपूर्ण विद्यापीठासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही समान महत्त्व देणे आवश्यक असून, विद्यापीठातील क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी तसेच खेळाडूंना आवश्यक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मध्य विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवातील फाईन आर्ट प्रकारात रौप्यपदक मिळविणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वैष्णवी शिंदे हिचा रोख रु. ७ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठात आयोजित ‘अविष्कार संशोधन महोत्सवा’त रौप्यपदक मिळविणाऱ्या कृषि महाविद्यालय, परभणी येथील सुभाष कुमार तसेच अन्नतंत्र महाविद्यालयाच्या गायत्री शिंदे यांचाही प्रत्येकी रोख रु. ७ हजार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच मध्यांचल विद्यापीठ, भोपाळ येथे झालेल्या आंतरविद्यापीठ वुडबॉल स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या कृषि महाविद्यालय, नांदेड/नाव्हा येथील ओम सरवंदे याचा रोख रु. ५ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सन २०२५-२६ मध्ये आंतरमहाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या विद्यापीठातील महाविद्यालयांचाही माननीय कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कृषि महाविद्यालय, परभणी (क्रिकेट व युवक महोत्सव), कृषि महाविद्यालय, खंडाळा (कबड्डी मुले), कृषि महाविद्यालय, पाथरी (खो-खो मुले व टेबल टेनिस मुले), कृषि महाविद्यालय, आष्टी (व्हॉलीबॉल मुले), कृषि महाविद्यालय, नायगाव बाजार (बुद्धिबळ मुले), अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी (व्हॉलीबॉल, बॅडमिंटन व टेबल टेनिस मुली), कृषि अभियंत्रिकी महाविद्यालय, परभणी (कबड्डी व बास्केटबॉल मुली), राजीव गांधी कृषि महाविद्यालय, परभणी (खो-खो मुली) आणि कृषि महाविद्यालय, नाव्हा (वुडबॉल मुले) यांचा समावेश आहे.

बैठकीच्या प्रारंभी क्रीडा मंडळाचा अजेंडा डॉ. राजेश कदम यांनी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सभागृहासमोर मांडला. तसेच ‘क्रीडा संस्कृती’ आणि रासेयोचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.

यावेळी विद्यापीठ परिसरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पुढील वर्षी विद्यापीठास ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रत्येकाने किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील विविध कामगिरीचा आढावा घेत आगामी काळात क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस विद्यापीठातील क्रीडा अधिकारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.