वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्यदिन हा
प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणि भावनेचा दिवस असून, देशाच्या
स्वातंत्र्यासाठी त्याग, संघर्ष, साहस
व बलिदान देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा
पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात
आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत
होते.
माननीय कुलगुरूंनी
राष्ट्रपिता महात्मा गांधी,
नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,
भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह
सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली.
पुढे बोलताना
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, भारत आज विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, डिजिटल
तंत्रज्ञान, स्टार्टअप, जैवतंत्रज्ञान
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करीत आहे.
आर्थिकदृष्ट्या समृद्ध भारताबरोबरच आत्मनिर्भर, समावेशक,
पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानसक्षम आणि
सामाजिकदृष्ट्या न्याय्य भारत निर्माण करणे आवश्यक आहे. ‘विकसित भारत @2047’
हा संकल्प प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय मिशन असल्याचे त्यांनी
सांगितले.
कृषि विद्यापीठ
म्हणून शेतकरी आणि कृषी क्षेत्राप्रती विद्यापीठाची जबाबदारी अधिक मोठी आहे.
भारताच्या प्रगतीचा मार्ग गाव आणि शेतातून जातो. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या
अर्थव्यवस्थेचा आणि अन्नसुरक्षेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे, असे
कुलगुरूंनी स्पष्ट केले.
हवामान बदल, अनियमित
पाऊस, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास,
वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता ही कृषी
क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर विज्ञान, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची गरज आहे.
कमी पाण्यात अधिक उत्पादन, कमी खर्चात अधिक उत्पन्न आणि
हवामान बदलाचा सक्षमपणे सामना करणारी लवचिक व शाश्वत शेती विकसित करण्यावर भर देणे
आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाच्या
शैक्षणिक,
संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा
घेताना कुलगुरूंनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI),
ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल कृषि यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या
संधी निर्माण होत आहेत. विद्यापीठाच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल फार्मिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-आधारित कृषि सल्ला आणि विविध नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे.
विद्यार्थी आणि युवा
शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता न राहता नवोन्मेषक व
तंत्रज्ञाननिर्माता बनावे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळांमध्ये विकसित होणारे
तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना
मिळावा,
हा विद्यापीठाचा प्रमुख प्रयत्न आहे. तसेच कृषि विद्यापीठ हे केवळ
शिक्षण देणारी संस्था नसून ज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि शेतकरी सेवेचे केंद्र आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या
स्थानिक गरजा व समस्यांचा अभ्यास करून त्यावर स्थानिक पातळीवर वैज्ञानिक आणि
परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.
विद्यार्थी हे
भारताच्या भविष्याचे निर्माते आहेत. ज्ञान, तंत्रज्ञान आणि उपलब्ध
संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, परिश्रम आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना
जोपासावी. केवळ नोकरी मिळविण्याऐवजी रोजगारनिर्माते होण्याचा संकल्प करावा. कृषि
उद्योजकता, अॅग्री-स्टार्टअप्स, अन्नप्रक्रिया,
डिजिटल कृषि, जैवतंत्रज्ञान आणि कृषिव्यवसाय
या क्षेत्रांत युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा
आणि कौशल्याचा उपयोग समाज व शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी
व्हावा, असे त्यांनी नमूद केले.
जल, मृदा,
जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधने ही केवळ वर्तमान पिढीची संपत्ती
नसून भावी पिढ्यांचीही अमूल्य ठेव आहे. त्यामुळे जलसंधारण, मृदासंवर्धन,
नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर, जैवविविधता
संवर्धन आणि हवामान-स्मार्ट कृषि यांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पाच राष्ट्रीय
संकल्प घेण्याचे आवाहन
स्वातंत्र्यदिनाच्या
या राष्ट्रीय पर्वानिमित्त प्रत्येकाने पाच संकल्प घेण्याचे आवाहन कुलगुरूंनी
केले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, कृषि व शेतकरी कल्याणासाठी
ज्ञान व कौशल्याचा उपयोग करणे, विज्ञान, नवोन्मेष आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, जल-मृदा-पर्यावरणाचे
संरक्षण करणे आणि विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान देणे, हे पाच संकल्प त्यांनी मांडले.
“ज्ञानातून
राष्ट्रनिर्माण, विज्ञानातून कृषि उत्थान, नवोन्मेषातून आत्मनिर्भरता आणि आपल्या कर्मातून विकसित भारत” या ध्येयाने
सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन करताना कुलगुरूंनी सांगितले की, स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून मिळाले असून ते सार्थक
करण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे.
“हर
शेतकरी समृद्ध होवो, प्रत्येक युवा सशक्त होवो, प्रत्येक गाव आत्मनिर्भर होवो आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्राचा
अभिमान वाटो,” अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी “जय जवान! जय
किसान! जय विज्ञान! जय अनुसंधान! जय हिंद! जय महाराष्ट्र!” असा संदेश दिला. तसेच
विद्यापीठातील सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कर्मचारी
यांना ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या समारंभास
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री.
दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, छात्रसेना
अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख, क्रीडा शिक्षक डॉ. संघर्ष
शृंगारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.
उदय वाईकर यांनी केले.


.jpeg)






