वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठा खंड पडला आहे.
विविध हवामान संस्थांच्या अंदाजानुसार आगामी काळात जोरदार पावसाची शक्यताही कमी
आहे. खरिपातील प्रमुख पिके सध्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत आहेत. त्याचवेळी
नेमका पावसाचा खंड पडल्याने, पिकांची
काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पावसाच्या खंड काळात नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी
अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले की,
सध्याच्या
परिस्थितीत पिकांची अवस्था, जमिनीतील
ओलावा लक्षात घ्यावा, उपलब्ध
पाण्याचा कार्यक्षम वापर करा आणि प्रत्येक पावसाच्या थेंबाचे संधारण करा या
तत्त्वावर पुढील पीक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
१)
शेतातील परिस्थितीचे परीक्षण करा
सर्व शेतांमध्ये एकसारखे व्यवस्थापन करणे योग्य नाही.
प्रत्येक शेतातील जमिनीचा प्रकार, उपलब्ध
ओलावा, पिकाची अवस्था, पिकाची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि
पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. शेतातील माती हातात घेऊन
तिच्यामध्ये पुरेसा ओलावा आहे का हे तपासावे. पिकाची पाने सकाळच्या वेळी तजेलदार
आहेत का, दुपारच्या वेळी पाने वाकतात
का, पाने गुंडाळली जात आहेत का, वाढ मंदावली आहे का, फुलगळ होत आहे का, याचे निरीक्षण करा.
त्यानुसार पिकांना संरक्षित सिंचन देण्याचा निर्णय घ्या.
२) संरक्षित सिंचन काटेकोरपणे वापरा
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल,
शेततळे, कालवा किंवा अन्य सिंचनाची
सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी
उपलब्ध पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर करावा. पाण्याचा जास्त ताण बसलेल्या
पिंकांसाठी, त्यांच्या
संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचनाचा वापर करा. सिंचनासाठी शक्यतो, ठिबक किंवा तुषार सिंचनाचा
वापर करा.
३) पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण
करा
जो काही पाऊस पडेल त्या पावसाचे पाणी शेतात मुरविणे
अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेताच्या उतारानुसार जलसंधारणाच्या सऱ्या काढाव्यात, पुढील नियोजनासाठी शक्य
तिथे कंपार्टमेंट बंडिंग, समतल
बांध बंधिस्ती, सध्या
शेततळ्यांचा आणि त्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर, नाला बांध व लघु जलसंधारण येथील पाण्याचा
योग्य वापर, पावसाचे पाणी शेताबाहेर
वेगाने वाहून जाणार नाही याची काळजी घेणे,
शेताच्या
उतारानुसार योग्य ठिकाणी पाणी अडविण्याची व्यवस्था करावी. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध
ओलावा पिकाच्या मुळांपर्यंत टिकवून ठेवा.
या सूत्रानुसार शक्य ते व्यवस्थापन करावे. सर्वात सोपे आणि कमी खर्चाचे
तंत्रज्ञान म्हणजे कपाशी, तूर
सारख्या अधिक अंतरावरील पिकांत एक ते दोन ओळीनंतर जल संधारण सरी काढावी.
४) तण नियंत्रणाला प्राधान्य
कमी पावसाच्या सध्याच्या परिस्थितीत तण हे पिकांशी पाणी,अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश व जागेसाठी
स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या खंड
काळात तण नियंत्रण केल्यास मातीतील उपलब्ध
ओलावा मुख्य पिकासाठी उपयुक्त ठरतो. सध्या पिकांची अवस्था पाहून खुरपणी आणि कोळपणी
करावी. पीक फुलावर असल्यास कोळपणी टाळावी. शक्य तिथे उपट तण करावे. मजूर उपलब्ध नसल्यास संबंधित पिकासाठी शिफारशीत
उगवणपश्चात तणनाशकाचा वापर करावा. पिकांची आणि तणांची योग्य अवस्था, तणनाशकाची फवारणी करताना एकरी योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत
वापरावी आणि यासाठी पाण्याचा योग्य
प्रमाणात वापर करावा. जमिनीत ओल असावी. मात्र पिकावर ताण असताना किंवा
पाऊस/सिंचनानंतर अति ओलाव्याच्या स्थितीत तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी स्थानिक
शिफारशींचे पालन करावे. आता तण नाशक वापरण्याची वेळ अनेक पिकात निघून गेली आहे.
हळद, ऊस किंवा फळ पिकात वापर
करता येईल. शिफारशी नुसारच तणनाशकांचा वापर करावा.
५)
आंतर मशागत आणि जमिनीतील भेगा बुजवा
आंतर मशागत करताना पिकांच्या अवस्थेनुसार हलक्या कोळपण्या
कराव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, तण नियंत्रण करावे. परंतु जिथे पीक फुलावर
असताना कोळपणी करू नये. फळ बागेत यावर भर द्यावा. जमिनीतील भेगा बुजवा पावसाचा
दीर्घ खंड पडल्यास विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडू
शकतात. या भेगांमधून जमिनीतील ओलावा वेगाने निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून
पिकाच्या योग्य अवस्थेत आंतरमशागत करून
पृष्ठभागावरील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
६) एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
पावसातील खंड आणि त्यानंतर मध्यम पाऊस अशा स्थितीत शेताचे नियमित निरीक्षण करावे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मक्यामध्ये
पानांवरील कीड, शेंगा/बोंडांवरील
कीड, खोडकिडी या शिवाय रस शोषण
करणाऱ्या किडींचे निरीक्षण करावे.
आणि शिफारशी नुसार त्या त्या कीटक नाशकांची किंवा
बुरशीनाशकांची फवारणी कीड किंवा आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यावर करावी.
तसेच रोगांची लक्षणे तपासावीत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान जसे फेरोमोन सापळे, पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे आणि निंबोळी अर्क
किंवा इतर जैविक उपायांचा योग्य वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केवळ
गरजेनुसार आणि शिफारशीनुसार करावा.
७) आच्छादनाचा वापर
ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवणे
किंवा योग्य आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. आच्छादनामुळे: बाष्पीभवन कमी
होते, जमिनीतील ओलावा जास्त काळ
टिकतो, जमिनीचे तापमान नियंत्रित
राहते, तणांची वाढ कमी होते,जमिनीतील सेंद्रिय पदार्थ
वाढण्यास मदत होते. यात सोयाबीन पीक भुसा किंवा इतर पिकांचे अवशेष ५ टन प्रति
हेक्टरी वापरावे. किंवा सुबाभूळ, गिरीपुष्प यांचा पाला ३ टन
प्रति हेक्टरी आच्छादन म्हणून वापरावे. साधी कोळपणी करून मातीचे आच्छादन करावे.
८)
अन्नद्रव्यांची फवारणी
पावसाचा खंड पडून जमिनीतील ओलावा कमी झाल्यास आणि पिकांची
वाढ मंदावल्यास, जमिनीतून
अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाच्या अवस्थेनुसार
पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते.
पोटॅशियम नायट्रेट (13:00:45): दोन टक्के द्रावण, म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर
पाणी, फवारणी करता येईल. किंवा
19:19:19 (पाण्यात विरघळणारे नत्र, स्फुरद, पालाश): एक टक्का द्रावण, म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर
पाणी, फवारणी करता येईल. 10 लिटर
पाण्यासाठी अनुक्रमे 200 ग्रॅम 13:00:45 किंवा 100 ग्रॅम 19:19:19 आवश्यक
राहील. यामुळे काही दिवस पाण्याचा ताण सहन
करता येईल. साध्या पाण्याची फवारणी केली तरी पिके 2 ते 4 दिवस ताण सहन करू शकतील. सध्या हळद, ऊस आणि फळ पिकात एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. गांडुळ खत, जैविक खते वापरावीत.
योग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक
पाऊस कमी असला तरी जल संधारण, पाण्याची
बचत आणि उपलब्ध पाण्याचा आधुनिक सिंचन पद्धतीने कार्यक्षम वापर आणि मृदओलावा
संवर्धन आपल्या हातात आहे. पुढील पावसाचे पाणी जलसंधारण सऱ्यांद्वारे शेतात मुरवा, उपलब्ध सेंद्रिय अवशेषांनी
आच्छादन करा, योग्य
वेळी आंतरमशागत करून मातीचे आच्छादन तयार करा,
जमिनीतील
भेगा बुजवा आणि पिकाच्या अवस्थेनुसार मातीची भर द्यावी. कमी खर्चाच्या जैविक
निविष्ठांचा वापर करा आणि फवारणीतून अन्नद्रव्यांची फवारणी करा आणि पिके वाचवा.
असा सल्ला विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू
शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
मधुकर मोरे, डॉ.
गणेश गायकवाड, कनिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे, यंग
प्रोफेशनल (वन) श्री. सुरेश खटिंग आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मंगेश राऊत
यांनी दिला.
अधिक माहितीसाठी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९५८८६४८२४२ यावर संपर्क साधावा.
.jpeg)
