Sunday, August 16, 2026

नैसर्गिक शेती व सेंद्रिय उत्पादनांना चालना देण्यासाठी वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण; शेतमालातील कीटकनाशक अवशेष तपासणीसह सुरक्षित अन्न उत्पादनाला मिळणार चालना



भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळे’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. राजेश कदम व डॉ. हरिहर कौसडीकर यांची उपस्थिती होती.

शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची होणार तपासणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या या प्रगत प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी, सुरक्षित अन्न उत्पादनाला चालना तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. शेतमालामध्ये कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर, योग्य मात्रा व योग्य वेळेचे पालन तसेच काढणीपूर्व कालावधीचे महत्त्व याबाबतही शेतकरी व संबंधित घटकांमध्ये जनजागृती करण्यास या प्रयोगशाळेची मदत होणार आहे.

प्रयोगशाळेत नमुना तयार करणे, अर्कनिर्मिती व शुद्धीकरणासाठी विविध आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये हाय-स्पीड होमोजेनायझर, मल्टी-ट्यूब व्हॉर्टेक्स मिक्सर, नायट्रोजन इव्हॅपोरेटर, रोटरी इव्हॅपोरेटर, सेंट्रीफ्यूज, मायक्रोपिपेट्स, अचूक वजनकाटे आदी उपकरणांचा समावेश आहे. कीटकनाशक अवशेषांच्या विश्लेषणासाठी LC-MS/MS आणि GC-MS/MS सारख्या अत्याधुनिक विश्लेषण प्रणालींचाही समावेश आहे. या उपकरणाचे प्रात्यक्षिक विभागातील शास्त्रज्ञांनी दिले.

सुरक्षित अन्न उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

यावेळी मार्गदर्शन करताना मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी, सुरक्षित अन्न उत्पादन आणि नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण कृषि क्षेत्राला लाभ होणार असून, गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शेतमाल उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर करण्याचे आवाहन

कीटकनाशकांचा अतिरेकी अथवा चुकीचा वापर केल्यास शेतमालामध्ये अवशेष राहण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करताना शिफारशीनुसार औषध, योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि सुरक्षित पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. फवारणी करताना मास्क, हातमोजे व संरक्षक कपड्यांचा वापर करणे, फवारणीच्या वेळी खाणे-पिणे टाळणे तसेच फवारणीनंतर हात व चेहरा स्वच्छ धुणे यासारख्या सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे आहे.

कीटकनाशकांचा काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेला हातभार लागेल. शिफारस केलेले औषध – योग्य प्रमाण – योग्य वेळ – सुरक्षित भविष्य’ या संदेशातून कीटकनाशकांच्या विवेकपूर्ण वापराबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी विभागातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

सदरील प्रयोगशाळा उभारणीच्या प्रवासात विद्यमान संशोधन संचालक डॉ भगवान आसेवार, माजी संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, डॉ खिजर बेग, विद्यमान अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, माजी अधिष्ठाताडॉ. सय्यद इस्माईल  यांच्या मार्गदरशनाखाली डॉ पी एस नेहरकर, डॉ संजीव बंटेवाड, डॉ धीरज कदम डॉ पी आर झंवर डॉ मिलिंद सोनकांबळे डॉ अनंत लाड श्री अनुराग खंदारे, श्री बालाजी कोकणे व विभागातील कर्मचारी यांनी वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर योगदान दिले.