वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प–कृषिरत महिला यांच्या
संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यदिन–२०२६’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत
दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये
देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान, राष्ट्रीय
एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या
रॅलीचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून, शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ. राजेश कदम पुढाकारातून अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड तसेच राष्ट्रीय
सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हातात तिरंगा
ध्वज घेतला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय जवान,
जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय
एकात्मता आणि राष्ट्रध्वजाप्रती आदराची भावना प्रकर्षाने दिसून आली.
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून सुरू झालेली ही तिरंगा रॅली विद्यापीठ
परिसरातून मार्गक्रमण करत पुढे विद्यापीठस्तरीय तिरंगा रॅलीमध्ये विलीन झाली. या
उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला असून, ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत
पोहोचविण्यात आला.

