माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची फ्लायिंग ग्राऊंडला भेट; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व प्रमाणपत्रांचे वितरण
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्थापन
करण्यात आलेल्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA)
मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ
/ VNMKV–RPTO) येथे सारथीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सेनापती धनाजी जाधव
शेतकरी ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाच्या दुसऱ्या
बॅचचे सात दिवसीय प्रशिक्षण दिनांक १७ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या
पूर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वनामकृवि – आरपीटीओच्या फ्लायिंग ग्राऊंडला भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी
संवाद साधला. त्यांनी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण
प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली तसेच कृषि क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या
वाढत्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ कृषि
फवारणीपुरता मर्यादित न ठेवता सर्वेक्षण, मॅपिंग, पीक
निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध कृषि-आधारित
सेवांसाठी करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी
प्रशिक्षणार्थींना केले.
वनामकृवि – आरपीटीओ
येथे
डीजीसीएच्या मानकांनुसार ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रशिक्षणामध्ये
सैद्धांतिक ज्ञान, सिम्युलेटर प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष
ड्रोन उड्डाणाचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना सुरक्षितपणे ड्रोन हाताळणी,
उड्डाण संचालन आणि कृषि क्षेत्रातील ड्रोनच्या विविध उपयोगांची
माहिती देण्यात येत आहे.
यापूर्वी दिनांक ५ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पहिल्या बॅचमधील १०
प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या बॅचचेही
प्रशिक्षण पूर्ण झाले असून, सारथीच्या सहकार्याने वनामकृवि
– आरपीटीओ येथे दर
महिन्याला तीन ड्रोन पायलट प्रशिक्षण बॅच आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुढील तिसरी बॅच दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील
युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे अधिकृत प्रशिक्षण घेऊन कृषि तसेच इतर विविध
क्षेत्रांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ.
भगवान आसेवार, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषि
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उपसंचालक (बियाणे)
तथा विभाग प्रमुख डॉ. हरिकांत काळपांडे, कीटक शास्त्र विभाग प्रमुख
डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, पाणी सिंचन
व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, वनामकृवि – आरपीटीओचे प्रमुख डॉ. विशाल इंगळे, कीटक शास्त्रज्ञ डॉ.
अनंत लाड, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ.
श्रद्धा धुरगुडे, श्री. ऋषिकेश औंढेकर तसेच कृषि
महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वनामकृवि – आरपीटीओच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासोबतच युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे.
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)