वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) यांच्या संयुक्त
विद्यमाने हरियाली अमावस्येनिमित्त दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले.
हरियाली अमावस्येच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन तसेच हरित
व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण
विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी केले होते. या आवाहनाला
प्रतिसाद देत महाविद्यालय परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमातून ‘प्रत्येकाने किमान एक रोप लावावे आणि
त्याचे संगोपन करावे’ हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण
करण्यावर भर देण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासोबतच पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हरित परिसर निर्मिती आणि शाश्वत पर्यावरण
संवर्धनाचा संकल्प केला.
यानिमित्त बोलताना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ.
नीता गायकवाड यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन,
वृक्षांचे महत्त्व तसेच शाश्वत व निरोगी जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण
करणे हा असल्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन,
पाणी व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी
वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच स्वच्छ हवा, मृदासंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि
निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “एक
विद्यार्थी–एक रोप” ही संकल्पना जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाची
जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून आजचे रोप म्हणजे उद्याची हिरवीगार सावली हा संदेश
देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामूहिक
जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना
विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक
हिरवागार व पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
हरियाली अमावस्या वृक्षारोपण अभियानातून “एक रोप लावा, एक झाड जगवा आणि हरित, निरोगी व शाश्वत भविष्यासाठी योगदान द्या” असा प्रभावी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
.jpeg)
.png)
.png)