वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि
संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या छत्रपती
संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे ‘गो-म्हैस
स्टार्टअप : गोठ्यापासून उद्योगापर्यंत’ या विषयावर पाच दिवसीय कौशल्य विकासाधारित
व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणात जिल्ह्यातील
९० हून अधिक तरुण शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य तसेच इच्छुक उद्योजकांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी व तज्ज्ञ मार्गदर्शक जिल्हा
दुग्धविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर श्रीमती मनिषा हराळ-मोरे यांनी मार्गदर्शन करताना,
गो-म्हैस व्यवसाय हा शेतकऱ्याचा स्वाभिमान, महिलांच्या
सबलीकरणाचे माध्यम आणि गावाच्या आर्थिक विकासाचा आधार आहे, असे
सांगितले. तरुण पिढीने या व्यवसायाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता
त्याचे उद्योगात रूपांतर करून रोजगारनिर्मिती करावी, असे
आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मार्गदर्शन करताना गो-म्हैस
स्टार्टअपचे महत्त्व स्पष्ट केले. शेतीसोबत दुग्ध व्यवसायातून वर्षभर नियमित
उत्पन्न मिळू शकते, महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होते, गावातच
रोजगाराच्या संधी निर्माण होतात तसेच शेणखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता
वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून कृषि विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन व
दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनी काम पाहिले.
प्रशिक्षणादरम्यान वैज्ञानिक पद्धतीने गोपालन, गाय-म्हशींची निवड, आहार व संगोपन, आधुनिक गोठा व्यवस्थापन, म्हशींसाठी विविध निवास पद्धती, रोग प्रतिबंध,
लसीकरण, स्वच्छता व प्राथमिक उपचार, दुग्ध प्रक्रिया व मूल्यवर्धन, विपणन आणि वित्त
व्यवस्थापन या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ.
निहाल मुल्ला यांनी चारा व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभाग,
खुलताबाद येथील सहायक आयुक्त डॉ. उत्कर्ष वानखेडे यांनी शासनाच्या
विविध योजनांची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी, सावंगी
बाजार येथील डॉ. बिचोळे यांनी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कृषि विस्तार शिक्षण
विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे यांनी जैविक निविष्ठा निर्मितीविषयी मार्गदर्शन
केले.
प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सावंगी बाजार येथील कृषि विज्ञान केंद्राच्या
माध्यमातून तरुण डेअरी उद्योजक श्री. संदीप नलावडे, संचालक, आदर्श
डेअरी यांच्या डेअरी उद्योगाला प्रक्षेत्र भेट देण्यात आली. त्यांनी दुग्ध
व्यवसायापासून उद्योग उभारणीपर्यंतचा प्रवास आणि यशोगाथा प्रशिक्षणार्थींना
सांगितली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील श्याम गोसंवर्धन केंद्राला भेट देऊन शेण व
गोमूत्रापासून जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. यावेळी श्री.
राजकिरणजी व श्री. सुधीर विद्वांस यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
करण्यात आले. प्रशिक्षणातून प्रेरणा घेत अनेक प्रशिक्षणार्थींनी लवकरच स्वतःचा
गो-म्हैस व दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सतीश कदम, श्री. जयदेव सिंगल आणि श्री. जयदीप बनसोडे यांनी सहकार्य केले. कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
