स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सह्याद्री वसतिगृहात
विद्यार्थ्यांसाठी नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ (RO), यूव्ही (UV),
यूएफ (UF) जलशुद्धीकरण व वॉटर कूलिंग
प्रणालीचे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली आहे. या सुविधेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या
दृष्टीने महत्त्वाची असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.
यानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांचे
आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास ही विद्यापीठाची
प्रमुख प्राथमिकता आहे. शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल आणि त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष
केंद्रित करता येईल. विद्यार्थीकेंद्रित सुविधा निर्माण करण्यासाठी विद्यापीठ
प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना बदलत्या ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले.
तसेच उपलब्ध सुविधेचा सुयोग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत
शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी वातावरण आणि आवश्यक सुविधा यांचे महत्त्व अधोरेखित
केले.
वसतिगृह अधीक्षक डॉ. रवींद्र शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
वसतिगृहातील शिस्त, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधांची योग्य देखभाल यांचा आढावा सादर केला, तसेच विद्यार्थ्यांच्या
वतीने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.
या उद्घाटन समारंभास प्रा. रघुनाथ जायभाये, प्रा. अनिल कांबळे, प्रा. विशाल इंगळे, प्रा. दत्ता पाटील, राजाराम वाघ यांच्यासह सह्याद्री वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य व हिताला प्राधान्य देत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचे विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
