Sunday, August 9, 2026

शेतकरी हितासाठी कृषि विस्ताराला अधिक गतिमान करण्याची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या खामगाव येथील कृषि विज्ञान केंद्राची १० वी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक; जैविक निविष्ठा निर्मिती युनिटचे उद्घाटन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान, संशोधनाचे निष्कर्ष आणि शेतकरी-केंद्रित विस्तार उपक्रम प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्रांनी प्रयोग, प्रात्यक्षिके व प्रशिक्षणांच्या माध्यमातून कृषि विस्तार कार्याला अधिक गतिमान करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथे दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी १० वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, अटारी, पुणे येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकिर अली, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बीड श्री. सुभाष साळवे, कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जैविक निविष्ठा निर्मिती युनिटचे उद्घाटन

बैठकीच्या प्रारंभी कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जैविक निविष्ठा निर्मिती युनिटचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जैविक निविष्ठांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. जैविक निविष्ठांचा वापर वाढल्यास रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

कृषि विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा. कृषि विज्ञान केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रयोगांचे निष्कर्ष अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत तसेच आधुनिक व प्रगत कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्र, खामगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. त्यांनी मागील वर्षभरात केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या विविध विस्तार कार्यांचा आढावा व अहवाल सादर केला. त्यानंतर केंद्रातील शास्त्रज्ञांनी विषयानुसार आपल्या कार्याचा आढावा सादर करून संशोधन, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि विस्तार कार्याची माहिती वैज्ञानिक सल्लागार समितीसमोर मांडली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नैसर्गिक शेती – काळाची गरज’, ‘रेशीम किटकावरील उझी माशीचे व्यवस्थापन’, ‘ज्वारी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान’ आणि जनावरांमधील लंपी स्कीन रोगाचे व्यवस्थापन’ या घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार

कृषि विज्ञान केंद्राशी संलग्न शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून इतर शेतकऱ्यांनीही आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीस उपविभागीय कृषि अधिकारी, माजलगाव श्रीमती श्रद्धा भवारी, तालुका कृषि अधिकारी, गेवराई श्री. सचिन गिरी, मंडळ कृषि अधिकारी, गेवराई श्री. सतीश केसभट, समितीचे सदस्य शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, उद्यानपंडित श्री. राजेंद्र आतकरे, धान फाउंडेशन, कोरोमंडल, माविम बीडचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आगामी उपक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना

बैठकीच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत मार्गदर्शक सूचना व मौल्यवान अभिप्राय दिला. या सूचनांच्या आधारे आगामी काळातील कृषि विस्तार, संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांची दिशा निश्चित करून शेतकरी-केंद्रित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. तुकेश सूरपाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. किशोर जगताप, डॉ. गणेश मंडलिक, श्री. गजेंद्र आढावे, श्री. दीपक इंगळे, श्री. दत्तप्रसाद वीर, श्री. सुधाकर काटे, श्री. विजयकुमार चांदणे आणि श्रीमती शोभा मार्गे यांनी परिश्रम घेतले.