Wednesday, August 19, 2026

‘माझे घर, माझी बाग’ उपक्रमातून महिलांना परसबाग व घरगुती बागेचे प्रशिक्षण

 वनामकृवितील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्राचा उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय आणि लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माझे घर, माझी बाग’ या उपक्रमाचे आयोजन दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले.

हा उपक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संचालक संशोधन डॉ. भगवान असेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषिरत महिला केंद्राचा घटक समन्वयिका तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कार्यक्रमाचे समन्वयक तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी, मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, लोकमत समूहाच्या समन्वयिका राधिका जोगळेकर तसेच सखी मंचच्या लता साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात लोकमत सखी मंचाच्या सदस्यांना उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी व टोमॅटोच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, लोकमत समूहातर्फे आयोजित ‘माझे घर, माझी बाग’ या स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त सखींचा मान्यवरांच्या हस्ते लोकमत समूहातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी बियाण्यांची निवड, लागवड तंत्रज्ञान तसेच कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादन घेण्याच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. नीता गायकवाड यांनी संतुलित आहारातील भाजीपाल्याचे महत्त्व स्पष्ट करून कुटुंबाच्या आरोग्य व पोषणासाठी घरगुती भाजीपाला उत्पादनाची गरज अधोरेखित केली.

डॉ. पपीता गौरखेडे यांनी मातीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय घटक, कंपोस्ट व सेंद्रिय खतांचे महत्त्व सांगून घरगुती बागेसाठी सुपीक व आरोग्यदायी माती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले.

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रोपवाटीकेत डॉ. बी. एम. कलालवंडी यांनी भाजीपाला उत्पादनाच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी घराच्या उपलब्ध जागेनुसार वाफे, कुंड्या, कंटेनर तसेच इतर माध्यमांचा वापर करून भाजीपाला लागवड कशी करता येते, याबाबत माहिती दिली.

माझे घर, माझी बाग’ या संकल्पनेतून महिलांनी घराच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून पौष्टिक, सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने भाजीपाला तसेच औषधी वनस्पतींची लागवड करावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान घरगुती बागेचे नियोजन, सेंद्रिय खत व कंपोस्ट तयार करणे, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, किचन गार्डन व औषधी वनस्पतींची लागवड, पाणी व्यवस्थापन, तण व कीड नियंत्रण, नियमित देखभाल तसेच उपलब्ध जागेचा प्रभावी वापर याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सहभागी महिलांना सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विविध संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागांच्या संशोधन कार्याचे प्रदर्शन, रोपवाटिका व बागेची पाहणी तसेच विविध पिकांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रांना भेट देण्यात आली. यामधून महिलांना घरगुती बागेसाठी उपयुक्त रोपांची निवड, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन व रोपांची निगा याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली.

घरच्या घरी ताजा, सुरक्षित व विषमुक्त भाजीपाला उपलब्ध झाल्यामुळे कुटुंबाच्या पोषणमूल्यात वाढ होते. तसेच घरगुती बागेमुळे महिलांना बागकामाचा आनंद मिळण्याबरोबरच अतिरिक्त भाजीपाला उत्पादनातून घरगुती खर्चात बचत व संभाव्य आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्य, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी मार्गदर्शकांनी नमूद केले.

या उपक्रमास कृषिरत महिला, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच परिसरातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. महिलांना घराच्या परिसरात उपलब्ध असलेल्या कमी जागेतही नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाला, फळे, फुले व औषधी वनस्पतींची लागवड करता यावी, यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. प्रत्येक घरात पोषणबाग’ ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.