Friday, August 14, 2026

वनामकृवित जिल्हास्तरीय ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’ उत्साहात; ‘रन फॉर एड्स कंट्रोल’च्या माध्यमातून एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’चे आयोजन शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठ परिसरात उत्साहात करण्यात आले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, युवक हे समाजातील परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहेत. एचआयव्ही/एड्सविषयी असलेले गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा जनजागृतीपर उपक्रमांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीची भावना निर्माण होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन निरोगी युवक – सुदृढ समाज’ घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. सहभागी युवकांनी उत्स्फूर्तपणे धाव घेत एचआयव्हीविषयी जाणून घ्या, गैरसमज दूर करा आणि एड्स नियंत्रणासाठी योगदान द्या’ असा जनजागृतीपर संदेश दिला.

रन फॉर एड्स कंट्रोल’ या संदेशातून एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती करणे, युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच समाजात एचआयव्हीबाधित व्यक्तींविषयी असलेले गैरसमज व कलंक दूर करण्याचा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी विद्यापीठातील शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध घटकांतील सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि सामाजिक आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संदेशही दिला. विद्यापीठ परिसरात मॅरेथॉनदरम्यान उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हास्तरीय ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’ च्या आयोजनामुळे एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रणाबाबत व्यापक जनजागृती करण्यास तसेच युवकांचा या सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग वाढविण्यास हातभार लागला.