सण-उत्सवांच्या काळात वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचे माननीय कुलगुरूंचे आवाहन
रक्षाबंधनाच्या निमित्ताने वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी दिनांक २८ ऑगस्ट
२०२६ रोजी संवाद साधला. सण-उत्सवांच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी आपल्या घरी जात
असताना वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना आपण घरापासून दूर आहोत, अशी
भावना निर्माण होऊ नये, यासाठी अशा प्रसंगी विद्यार्थ्यांशी
आवर्जून संवाद साधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यापीठातील
सर्व अधिकारी व संबंधितांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी
केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करण्यापेक्षा आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीची, संस्कारांची
आणि मूल्यांची जोपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृतीतील उत्तम
विचार माणुसकीची शिकवण देतात. तसेच जीवनात विनम्रता कायम ठेवून इतरांप्रती
कृतज्ञतेची भावना विकसित करण्यास मदत करतात, असे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना
आपल्या अंगी असलेल्या विविध छंदांची जोपासना करण्याचे आवाहन केले. विविध
राज्यांतून विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषा आत्मसात
करण्याचा प्रयत्न करावा. विविध भाषांचे आदान-प्रदान झाल्यास एकमेकांची संस्कृती, विचार
आणि परंपरा समजून घेण्यास मदत होते, असेही त्यांनी
मार्गदर्शन केले.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना उपलब्ध
असलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा, नवनवीन प्रयोगशाळांचा तसेच
अत्याधुनिक उपकरणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त उपयोग
करून घ्यावा. या सुविधांचा प्रभावी वापर करून आपल्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा
साधावी, असे आवाहनही माननीय कुलगुरूंनी केले.
विद्यार्थ्यांना येणारे विविध अनुभव, संशोधनासंदर्भातील
त्यांच्या नवीन कल्पना तसेच त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना या
विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आणि सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या सूचनांचे स्वागत करून त्यांचा सकारात्मक विचार करावा व योग्य
सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन माननीय
कुलगुरूंनी विद्यापीठातील सर्व अधिकारी व संबंधितांना केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व
मार्गदर्शकांप्रती आदराची भावना ठेवून त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जास्तीत
जास्त लाभ घ्यावा. त्याद्वारे आपले कौशल्य, ज्ञान आणि नैपुण्य विकसित
करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, अधीक्षक डॉ. मिलिंद सोनकांबळे तसेच उपस्थित अधिकारी यांना राखी बांधून त्यांचे आशीर्वाद घेतले. वसतिगृहाच्या सहायक अधीक्षिका डॉ. गोदावरी पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला. यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कु. ऋतुजा हिने भजन सादर केले. तसेच कु. निशा आणि कु. रिषिता यांनी वसतिगृहातील मागील दोन वर्षांतील आपल्या अनुभवांचे कथन करत वसतिगृह व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले. रक्षाबंधनाच्या या स्नेहपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
.jpeg)

.jpeg)


.jpeg)


.jpeg)