Saturday, August 15, 2026

वनामकृविच्या उत्तरा मुलींच्या वसतिगृहात अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन

विद्यार्थिनींनी अभ्यासिका सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या उत्तरा मुलींच्या वसतिगृहातील अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासाचे पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या अभ्यासिका कक्षामुळे विद्यार्थिनींना शांत व सुविधायुक्त वातावरणात नियमित अभ्यास करता येईल. विशेषतः स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि विविध व्यावसायिक संधींसाठी विद्यार्थिनींनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर घालावी.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच त्यांना आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या संधी मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

यावेळी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनींना शांत, सुसज्ज आणि अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभ्यासिका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक अभ्यासासाठी हा कक्ष विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना नियमित अभ्यासासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत आणि सहायक अधीक्षिका डॉ. मिनाक्षी पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला. यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचे उपस्थितांनी स्वागत केले. अभ्यासिका कक्षामुळे विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व विविध शैक्षणिक संधींसाठी अधिक प्रभावीपणे तयारी करता येणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच हातभार लागणार आहे.