कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करताना ‘शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान’ पोहोचविण्यासोबतच
अल्पभूधारक तसेच महिला शेतकऱ्यांच्या उन्नतीवर विशेष भर देणे आवश्यक आहे. यासाठी कृषि
विज्ञान केंद्रांची (KVK) भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,
असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद–कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (ICAR–ATARI), झोन–VIII, पुणे यांच्या
वतीने महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यांतील कृषि विज्ञान
केंद्रांच्या ९व्या वार्षिक विभागीय कार्यशाळेचे (9th Annual Zonal
Workshop of KVKs) आयोजन दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ दरम्यान
पुणे येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि हे सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. तसेच दिनांक ३० सप्टेंबर
२०२६ रोजी आयोजित तांत्रिक सत्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात
आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी नवी दिल्ली येथील भाकृअपचे उपमहासंचालक (कृषि
विस्तार) डॉ. राजबीर सिंग यांनी उद्घाटनपर
भाषण केले. यावेळी माननीय कुलगुरू, (RLBCAU,
झाशी)डॉ. ए. के. सिंग, अतिरिक्त महासंचालक (कृषि विस्तार) डॉ. राजर्षी
रॉय बर्मन, माजी कुलगुरू (बी.सी.के.व्ही, मोहनपूर) तथा साइट सिलेक्शन
कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. एम. अधिकारी, माजी उपमहासंचालक (कृषि
विस्तार) डॉ. के. डी. कोकाटे, माजी उपमहासंचालक (कृषि विस्तार)
डॉ. पी. दास यांनीही मार्गदर्शन केले, तसेच ICAR–ATARI, पुणेचे
संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी स्वागत व कार्यशाळेचा आढावा सादर केला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि पुढे म्हणाले की, कृषि विज्ञान केंद्रांनी विकसित व प्रसारित केलेले
तंत्रज्ञान केवळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या
शेतापर्यंत आणि प्रत्यक्ष वापरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पभूधारक
शेतकरी आणि महिला शेतकरी यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, कौशल्ये
व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषि विज्ञान
केंद्रांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे त्यांनी नमूद
केले.
बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गरजांनुसार
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, प्रशिक्षण व तज्ज्ञ सल्ला उपलब्ध
करून देण्याची गरज वाढली आहे. कृषि विज्ञान केंद्रांनी स्थानिक पातळीवरील कृषि
समस्या ओळखून त्यावर संशोधनाधारित आणि शेतकरी-केंद्रित उपाययोजना पोहोचविण्यासाठी
अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
माननीय कुलगुरूंनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा
विशेष उल्लेख केला. विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमाद्वारे शेतकरी
आणि शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद घडवून आणला जात आहे. तसेच ऑनलाइन
शेतकरी–शास्त्रज्ञ संवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना
तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. अशा उपक्रमांमुळे कृषि
तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होऊन शेतकरी कल्याणाला चालना मिळत असल्याचे त्यांनी
सांगितले.
कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्याला अधिक बळकटी देण्याची आवश्यकता असून, राष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त
झाले आहे. कृषि विस्ताराच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये
व्यापक प्रसार करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रे, कृषि
विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी परस्पर समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा
राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांच्या उत्कृष्ट कार्याचे सादरीकरण, विद्यापीठनिहाय विस्तार कार्याचा आढावा, तांत्रिक सत्रे
तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० सप्टेंबर
रोजी विद्यापीठनिहाय पूर्व-विभागीय कार्यशाळेच्या कार्यवाहीचे सादरीकरण करण्यात
आले. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीसह
महाराष्ट्र व गुजरातमधील कृषि विद्यापीठे आणि कृषि विज्ञान केंद्रांचा सहभाग आहे.
