सौरऊर्जेसोबत शेती उत्पादन वाढविणाऱ्या तंत्रज्ञानावर संशोधनाला चालना; वनामकृवि–बायफ यांच्यात सामंजस्य करारासाठी सकारात्मक चर्चा
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली
जर्मन एजन्सी जीआयझेड (GIZ) आणि सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या
संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक (Agriphotovoltaics) तंत्रज्ञानाच्या विकास व संशोधनासाठी परभणी जिल्ह्यातील मानवतजवळ कार्यरत असलेल्या
ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पास बायफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन,
ऊरळी कांचन, पुणे येथील प्रकल्प संचालक डॉ. विठ्ठल
कवठाळे तसेच शास्त्रज्ञ व सदस्यांनी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रक्षेत्र भेट दिली.
यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध संशोधन उपक्रमांची माहिती
घेतली तसेच प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केली.
यावेळी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी हे आधुनिक व प्रगत कृषि तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य
विद्यापीठ असून, ॲग्रीफोटोव्होल्टेइक्स क्षेत्रातील भारतातील
सर्वात मोठ्या संशोधन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प विद्यापीठात राबविला जात आहे,
ही अभिमानाची बाब आहे. सौरऊर्जा निर्मितीसोबतच शेती उत्पादन वाढविणे,
पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर
शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यासाठी या संशोधनाला विशेष महत्त्व असल्याचे
त्यांनी नमूद केले.
या बैठकीस शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे हे उपस्थित होते. त्यांनी प्रकल्पांतर्गत संशोधन
करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. ॲग्रीफोटोव्होल्टेइक्स
हे भविष्यातील महत्त्वाचे संशोधन क्षेत्र असून,
या क्षेत्रात संशोधन करणारे विद्यार्थी भविष्यातील शास्त्रज्ञ आहेत.
या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाच्या प्रमुख
अन्वेषक डॉ. गोदावरी पवार यांनी ॲग्रीफोटोव्होल्टेइक्स संशोधन प्रकल्पांतर्गत
राबविण्यात येत असलेल्या विविध प्रयोगांची व संशोधन उपक्रमांची सविस्तर माहिती
दिली. सौरऊर्जा निर्मितीसोबत कोणती पिके घेता येतील,
विविध पिकांची वाढ व उत्पादकता, सूक्ष्म
हवामानातील बदल, पाणी व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांसाठी
आर्थिकदृष्ट्या लाभदायक अशा एकात्मिक सौरऊर्जा–शेती पद्धती विकसित करण्याच्या
दृष्टीने सुरू असलेल्या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी बायफच्या
शास्त्रज्ञांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे व शंकांचे डॉ. पवार यांनी निरसन
केले.
या प्रक्षेत्र
भेटीदरम्यान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी, डॉ. विक्रम घोळवे, डॉ.
प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे आणि डॉ. सुदाम शिराळे यांच्यासह
संबंधित शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान
बायफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि वनामकृवि,
परभणी यांच्यातील संशोधन सहकार्य अधिक व्यापक करण्याबाबत सकारात्मक
चर्चा झाली. ॲग्रीफोटोव्होल्टेइक्ससह विद्यापीठातील विविध संशोधन क्षेत्रांमध्ये
संयुक्तपणे संशोधन व तंत्रज्ञान विकास करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
बायफच्या
पथकाने विद्यापीठातील बायोमिक्स उत्पादन केंद्र,
कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा, एकात्मिक शेती
संशोधन प्रक्षेत्र, कापूस संशोधन योजना, कोरडवाहू संशोधन प्रकल्प तसेच इतर संशोधन प्रक्षेत्रांना भेटी देऊन तेथील
संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. विद्यापीठातील विविध संशोधन उपक्रमांमध्ये
भविष्यात सहभागी होण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या भेटीमुळे सौरऊर्जा
निर्मिती, शेती उत्पादन,
संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि शाश्वत कृषि तंत्रज्ञान या
क्षेत्रांमध्ये वनामकृवि आणि बायफ यांच्यातील संशोधन सहकार्याला नवी दिशा
मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



.jpeg)